Home जिल्हा पत्ते खेळू न दिल्यावरून जिवाने ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; चंद्रपूर जिल्हा...

पत्ते खेळू न दिल्यावरून जिवाने ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

चंद्रपूर (प्रतिनिधी) :-पत्ते खेळू न दिल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या महत्त्वपूर्ण निकालामुळे न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काय होती नेमकी घटना ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास बामणीवाडा (ता. राजुरा) येथे ही थरारक घटना घडली. यातील मृतकाने आरोपीस पत्ते खेळू दिले नाही, याच कारणावरून आरोपीचा संताप अनावर झाला. वादाच्या भरात आरोपीने खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले, ज्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने लोखंडी सुरी मृतकाच्या पोटात खुपसून त्याला जागीच ठार मारले.

तत्पर पोलीस तपास व दोषारोपपत्र

याप्रकरणी मृताच्या फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (गु.र.नं. ५००/२०२२, कलम ३०२ भादवी सह ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये) आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली. तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी सखोल तपास करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितिजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयाचा निकाल व शिक्षा

चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. ए.के. लाहोटी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारतर्फे सरकारी वकील ॲड. श्रीमती सिमा रामटेक व श्री. पि. जि. घटट्वार यांनी प्रभावी युक्तिवाद केला आणि सबळ पुरावे सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त साधा कारावास) अशी कठोर शिक्षा सुनावली.

मार्गदर्शन व तपास पथक

सदर उत्कृष्ट तपास व कायदेशीर कारवाई पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर कातकडे व राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या प्रकरणात तपासी अधिकारी सपोनि प्रशांत साखरे, सरकारी वकील ॲड. श्रीमती सिमा रामटेक, श्री. पि. जि. घटट्वार तसेच कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार ललीता शेंडे (पो.स्टे. राजुरा) आणि चंद्रपूर दोषसिद्धी कक्षाचे विशेष योगदान लाभले.