शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार; आक्रमक भूमिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना!
वणी (यवतमाळ) :- खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा मशागत आणि बी-बियाणे जमवण्याच्या गडबडीत असतानाच, वणी उपविभागातील काही कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. खतांसोबत इतर अनावश्यक औषधे किंवा टॉनिक घेण्याची सक्ती (लिंकिंग) करून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या दुकानदारांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे,” अशा कडक शब्दांत मनसे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी कृषी केंद्र चालकांना ठणकावून सांगितले आहे.
🛑 नेमका प्रकार काय 🛑
वणी उपविभागातील अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
👉 सक्तीचे लिंकिंग :- “आमच्याकडून बियाणे घेतले तरच खत मिळेल” अशी अट घालणे.
👉 बोगस टॉनिकचा मारा :-DAP किंवा युरिया सारख्या मुख्य खतांसोबत गरज नसलेली महागडी कीटकनाशके किंवा दुय्यम दर्जाची खते घेण्याची सक्ती करणे.
👉 कृत्रिम टंचाई :-साठा असूनही खत नसल्याचे भासवून जादा दराने विक्री करण्याचे नियोजन.
प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम !
या गंभीर विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
1. भरारी पथकांची नेमणूक :-संपूर्ण उपविभागातील कृषी केंद्रांची तातडीने तपासणी करावी.
2. परवाना रद्द करा :- जे दुकानदार ‘लिंकिंग’ची सक्ती करतील, त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर ?फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
3. **फलक लावणे अनिवार्य :-प्रत्येक केंद्राबाहेर उपलब्ध खतसाठा आणि शासकीय किंमत (MRP) यांचा फलक उघडपणे लावावा.
“येत्या ८ दिवसांत प्रशासनाने ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर मनसे स्टाईलने उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि संबंधित कृषी केंद्रांवर तीव्र आंदोलन छेडले जाईल. यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल.”
👉 फाल्गुन गोहोकार (तालुकाध्यक्ष, मनसे, वणी)
🛑मनसेच्या शिष्टमंडळाची उपस्थिती🛑
निवेदन देतेवेळी शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष रमेशजी पेचे , गोविंदरावजी थेरे, विलन बोदाडकर, विट्ठल हेपट, रवि आगसकांडे, लक्ष्मण उपरे, दिनेश डोंगे, मारोती पडवे, मंगेश झाडे, खुशाल पानघाटे, गौरव काकडे, कुणाल पायघन, राहुल बोधाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा कृषी अधिकारी आणि पोलीस ठाणे वणी यांनाही माहितीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.
बळीराजाची लूट करणाऱ्यांविरुद्ध आता मनसेचा ‘आवाज’ घुमणार असून, कृषी विभागाने यावर काय कारवाई केली, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




