वारोरा :- अभिषक भागडे
येत्या १ मे पासून देशात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या जनगणनेत नागरिकांच्या घरातील विविध सुविधांची माहिती घेतली जाणार असून, यामध्ये टीव्ही, वाहन, मोबाईल, संगणक यांसह एकूण ३४ प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यावी लागणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून स्वतः ऑनलाइन स्व-गणना (Self-Enumeration) करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
👉 डिजिटल पोर्टल आणि प्रक्रियेचे स्वरूपक्ष:
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे (www.se.census.gov.in) स्वतःची माहिती भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकासाठी एक ‘युनिक आयडी’ (Unique ID) तयार होईल. ज्या नागरिकांनी ऑनलाइन माहिती भरली आहे, त्यांनी संबंधित प्रगणकाकडे (Enumerator) हा युनिक आयडी सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर १६ मे ते २४ जून या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन उर्वरित माहिती संकलित करतील.
👉 कुटुंबातील भौतिक सुविधांविषयी ३४ प्रश्न
या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने घरांची सुविधा आणि कुटुंबातील भौतिक साधनांवर भर देण्यात येणार आहे. यामध्ये खालील प्रमुख गोष्टींचा समावेश असेल:
👉 भौतिक साधने :-टीव्ही, मोबाईल, संगणक, वाहन इत्यादींची उपलब्धता.
👉 मूलभूत सुविधा :- कुटुंबाचे वेतन, शौचालयाची सुविधा, प्रकाशाचा स्रोत, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आणि स्वयंपाकाचे इंधन.
👉 कुटुंबाची माहिती :- कुटुंब प्रमुखाचे नाव, जातीचा प्रवर्ग, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, विवाहित जोडपे, घराच्या मालकीचा हक्क आणि घरातील खोल्यांची संख्या.
👉 भाडेकरूंची नोंद :- भाडेकरू राहत असल्यास त्यांच्या वास्तव्याची माहिती पोर्टलवर किंवा प्रगणकाकडे देण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
👉 प्रशासकीय तयारीया :- जनगणनेसाठी प्रशासनाने ३,१०० प्रगणक, ५१९ पर्यवेक्षक आणि ६१ फिल्ड ट्रेनर्सची नियुक्ती केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २,८१८ गटांमध्ये ही जनगणना प्रक्रिया राबविली जाणार आहे. महानगपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करेल, तर उर्वरित भागासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण होईल.
👉 पुढील टप्पा
जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून, यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्येची माहिती गोळा केली जाणार आहे.
👉 टीप :- नागरिकांनी जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन वेळेत आपली माहिती नोंदवून सहकार्य करावे.
🙏 जय विदर्भ 🙏




