वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ३ (संत गाडगेबाबा प्रभाग) मधील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि परिसरातील मंदिरांचा कायापालट करण्यासाठी नगरसेवक तथा भाजपा शहर अध्यक्ष संतोष सुरेश पवार यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. या संदर्भात त्यांनी वरोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदने देऊन तातडीने विकासकामे मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
🔴 रस्ते डांबरीकरण आणि खडीकरणाची मागणी 🔴
पहिल्या निवेदनात संतोष पवार यांनी प्रभागातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रभाग क्र. ३ मधील ‘श्रीकृष्ण नगर’ (डॉ. उमरे दवाखान्यापासून) ते ‘कृष्णनगरी’ (जय गिरनारी कंपनी समोरील रोड) पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा रस्ता सध्या दुरवस्थेत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
🔴 मंदिर परिसराचा होणार कायापालट 🔴
दुसऱ्या निवेदनात त्यांनी प्रभागातील विविध ले-आऊटमधील धार्मिक स्थळांच्या विकासावर भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे
आशीर्वाद ले-आऊट येथील हनुमान मंदिर परिसरात ‘वॉल कंपाउंड’चे बांधकाम करणे.
कश्यप ले-आऊट येथील हनुमान मंदिर परिसरात ‘वॉल कंपाउंड’, ‘ग्रीन जिम’ आणि ‘गट्टू’ (पेव्हर ब्लॉक) बसवणे.
शांतीवन ले-आऊट येथील हनुमान मंदिर परिसरात ‘ग्रीन जिम’ आणि ‘गट्टू’ बसवणे.
भाविकांची अडचण दूर करण्याची विनंती
या ले-आऊटमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली असून, येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, परिसरात सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिक आणि भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही सर्व कामे तातडीने मंजूर करून मार्गी लावावीत, जेणेकरून प्रभागाचा चेहरामोहरा बदलेल, अशी आग्रही विनंती संतोष पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी नगर परिषद प्रशासनाकडे ही निवेदने सुपूर्द करण्यात आली असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे प्रभागवासीयांचे लक्ष लागले आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




