Home Breaking News बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे मोठी चूक होती ...

बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे मोठी चूक होती | लोकवाहिनी |

बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे मोठी चूक होती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही मोठी चूक झाल्याची कबुली अजित पवार दिली आहे. रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक झाली. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली.
त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली.

—————–

अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

संजय महाराज, आरती अंकलीकर, बुध्दीसागर, दादरकर यांचाही होणार गौरव

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. अनुराधा पौडवाल यांना यंदा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यासोबतच अन्य 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी केली आहे. अनुराधा पौडवाल यांच्यासोबतच यंदा ‘भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024 मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे.


नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावादेखील घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील नगरपंचायत व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, पुढील काही दिवसांता नगराध्यक्षपदासाठी सोडत निघणार होती, त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार नगराध्यक्षदाची स्वप्ने रंगवत होती, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं आहे.

———–

मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनीना सुनावले खडे बोल

वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उमटतांना दिसले आहे. यापुढे प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या योजनेवर त्याचा परिणाम पडतो. सोबतच या वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांनाही आयता फायदा होतो. त्यामुळे बोलताना सर्वांनी विचार करून बोला, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुनावले आहेत.

————-

कोलकाता HCने डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण सोपवले CBIकडे

पुरावे नष्ट केले जाऊ शकतात

कोलराता उच्च न्यायालयाने मंगळवारी (13 ऑगस्ट) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. राज्य सरकार उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत केस डायरी आणि इतर रेकॉर्ड सीबीआयकडे हस्तांतरित करणार आहे.
मुख्य न्यायमूर्ती टी एस शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केव्ही राजेंद्रन प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवला. सुप्रीम कोर्टाने हे मान्य केले आहे की दुर्मिळ प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि योग्य तपास करणे आवश्यक आहे.
उच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही पोलिसांना तपासासाठी वेळ दिला असता, पण हे प्रकरण विचित्र आहे. घटनेला 5 दिवस उलटले तरी पोलीस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण तातडीने सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे, असे आम्हाला वाटते.