Home Breaking News लोकसभा उमेदवारांच्या प्रचार खर्चामध्ये तफावत

लोकसभा उमेदवारांच्या प्रचार खर्चामध्ये तफावत

 

पुणे 22 जून:- लोकसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी प्रचाराचा अंतिम खर्चाचा लेखाजोखा अद्याप प्रशासनाकडे सादर केला नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान ३० जूनपर्यंत संबंधित उमेदवारांनी अंतिम खर्च सादर केला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपासणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक येत्या २८ ते ३० जून दरम्यान पुण्यात दाखल होणार आहेत. तर पुण्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा अपक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत असून त्यावर संबंधितांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.निवडणूक आयोगाकडून उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांनी ३० दिवसांच्या आत प्रचारावर केलेल्या खर्चाचा लेखाजोखा सादर करणे आवश्यक असते. तसा उमेदवारांनी लेखाजोखा प्रशासनाकडे सादर केला. परंतु सहा उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याचे समोर आले आहे. या उमेदवारांना प्रशासनाकडून वेळोवेळी नोटीसही बजावण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडून अद्यापही खर्चामधील तफावतीचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, असे निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाचे समन्वयक सोनप्पा यमगर यांनी सांगितले.