राजुरा :-जिवती तालुक्यात न्यायालयासाठी मुख्यमंत्री सकारात्मक.१३राजुरा विधानसभा मतदारसंघातील आकांक्षित, डोंगराळ व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि आदिवासी बांधवांना स्थानिक स्तरावर सुलभ न्याय उपलब्ध व्हावा, यासाठी स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी धडक पाऊल उचलले आहेत. जिवती येथे पूर्णवेळ ‘दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग)’ (Civil Judge Junior Division & JMFC) न्यायालय तातडीने मंजूर करून सुरू करावे, या मागणीसाठी आमदार देवराव भोंगळे यांनी मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. आमदार देवराव भोंगळे यांच्या या मागणीची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत, जिवती येथे स्वतंत्र न्यायालय मंजुरीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
जिवती तालुक्याची निर्मिती २ जुलै २००२ रोजी झाली. निर्मितीला २४ वर्षे उलटून गेल्यानंतरही या आकांक्षित व अतिदुर्गम तालुक्याला न्याय व्यवस्थेच्या बाबतीत उपेक्षितच राहावे लागले आहे. सध्या जिवती येथे केवळ ‘ग्राम न्यायालय’ कार्यरत असून त्याचे अधिकारक्षेत्र अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना, महिलांना आणि पक्षकारांना छोट्या-मोठ्या दिवाणी व फौजदारी दाव्यांसाठी, तसेच न्यायालयीन तारखांसाठी १०० किलोमीटरचा खडतर प्रवास करून राजुरा किंवा चंद्रपूर येथील न्यायालयांत खेटे घालावे लागतात. दुर्गम भागातील खराब रस्ते आणि अपुरी वाहतूक साधने यामुळे स्थानिक जनतेचा वेळ, पैसा आणि मानसिक आरोग्य या सर्वांचीच मोठी हानी होत होती.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार देवराव भोंगळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. शासनाच्या “प्रत्येक नागरिकाला दारात आणि सुलभ न्याय” या धोरणानुसार जिवतीतील हजारो नागरिकांना या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवणे अयोग्य असून, वाढते दाव्यांचे प्रमाण पाहता येथे स्वतंत्र दिवाणी व प्रथम वर्ग न्यायालय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याप्रश्नी विशेष बाब म्हणून तातडीने प्रशासकीय, वित्तीय आणि पायाभूत मंजुरी देण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार भोंगळे यांनी निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सकारात्मक आश्वासनामुळे जिवती तालुक्यात लवकरच पूर्णवेळ न्यायालय सुरू होईल, आशा निर्माण झाली आहे.




