वरोरा :-माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ६८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी १२० रुग्णांची निवड करण्यात आली.
या निवड झालेल्या रुग्णांपैकी ४५ रुग्णांना शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालयाच्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तसेच उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केवळ रुग्णांची तपासणी न करता, उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. उर्वरित निवड झालेल्या रुग्णांनाही टप्प्याटप्प्याने पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव विधाते, सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेचे उपाध्यक्ष संजय दानव, संस्थेचे सचिव आशिष घुमे, योगेश क्षीरसागर, प्रशांत साळवे तसेच स्वयंसेवक नूतन बुरडकर उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आरोग्य उपक्रमातून मोठ्या संख्येने नागरिकांना आरोग्य तपासणी व पुढील उपचाराची सुविधा मिळत असल्याने परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.




