Home Breaking News इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा सुपुत्र झळकला; मोहक चवलेने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक!

इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा सुपुत्र झळकला; मोहक चवलेने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक!

वरोरा:- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग, कृषी आणि फार्मसी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात वरोऱ्याच्या मोहक संदीप चवले याने १०० टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. मोहकच्या या उत्तुंग यशाने केवळ त्याच्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे.

💠केवळ १२ विद्यार्थ्यांमध्ये मोहकचा समावेश💠
यावर्षीच्या परीक्षेत राज्यभरातून केवळ १२ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण (१०० परसेंटाइल) मिळवण्याचा पराक्रम केला असून, त्यात मोहकचा समावेश आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत मिळालेले हे यश त्याच्या बुद्धिमत्तेची आणि जिद्दीची साक्ष देते.
🙏अपयशातून घेतली यशाकडे भरारी🙏
मोहकच्या या प्रवासात एक भावनिक पैलूही आहे. मोहकने मागील दोन वर्षे प्रचंड मेहनत घेतली होती, मात्र पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने तो खचला होता. पण, खचून न जाता त्याने कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारी सुरू केली. वडिलांनी दिलेल्या या माहितीनुसार, “पहिल्या अपयशाने तो रडला होता, पण अपयशाचा धडा घेत त्याने दुसऱ्याच प्रयत्नात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिद्दीचे दर्शन घडवले.”
🙏कौटुंबिक संस्कारांचे यश🙏
मोहकच्या या यशामागे त्याचे वडील संदीप चवले, आई सौ. निता चवले आणि आजी श्रीमती पद्मा चवले यांचे संस्कार व मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. मोहकचे आजोबा (अकोला नं. २ येथील) श्री. बाबाराव उमरे यांच्यासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. मोहकला आता पुणे किंवा मुंबईतील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून तंत्रशिक्षण घेण्याची इच्छा आहे.
🙏भावी वाटचालीस शुभेच्छा!🙏
मोहकची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्याची ही ध्येयवेडी वाटचाल अशीच सुरू राहून तो देशपातळीवर नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
मोहक, तुझ्या या ऐतिहासिक यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन!