पुणे :- पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये २० ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या ‘पहिल्या इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये अवघ्या ७ वर्षीय अधिराज आशिष घुमे याने नेत्रदीपक कामगिरी करत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले आहे.
जगभरातील विविध देशांच्या दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अधिराजने आपल्या वयोगटात उत्कृष्ट कौशल्य, चपळाई आणि जिद्दीचे प्रदर्शन घडवले. या गटात संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) खेळाडूने सुवर्णपदक (प्रथम क्रमांक), तर श्रीलंकेच्या खेळाडूने रौप्यपदक (द्वितीय क्रमांक) पटकावले. त्यांच्याशी कडवी झुंज देत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिराजने तिसरा क्रमांक मिळवून देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला.
वर्ल्ड तायक्वांदो (World Taekwondo), द एशियन तायक्वांदो युनियन (ATU) आणि इंडिया तायक्वांदो यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अवघ्या सातव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवल्याबद्दल अधिराजवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून अधिराज हा ए.एन.सी. (ANC) ग्राउंड वरोरा येथे सराव करत असून, बजरंग वानखेडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे. पालक आणि क्रीडाप्रेमींकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे. त्याच्या या यशाने आगामी काळात तो देशासाठी आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




