वरोरा :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाच्या वतीने संत संतश्रेष्ठ जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर सन्मानपूर्वक साजरी करण्यात यावी, या प्रमुख मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, उपविभाग जिल्हा चंद्रपूर यांना नुकतेच सादर करण्यात आले.
संत संताजी जगनाडे महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत, समाजप्रबोधक व संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते. त्यांनी समाजात भक्ती, समानता, नैतिकता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या महान कार्यामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या विचारांचा व कार्याचा प्रसार व्हावा तसेच भावी पिढीला त्यांच्या योगदानाची माहिती मिळावी, यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशी आक्रमक व ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण निवेदनावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शुभम चांभारे (जिल्हा उपाध्यक्ष), शिरीष डहाके, हर्षद बोडणे, ओम वरभे, मधुर कातोरे, प्रणय चांभारे आणि शुभम गोल्हर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले.
तरी आपण आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना आवश्यक सूचना देऊन संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर सन्मानपूर्वक साजरी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.





