वरोरा :- मागील काही महिन्यांत अपुऱ्या पावसामुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील धरणे, तलाव व विहिरी पूर्णपणे न भरल्यामुळे आगामी काळात ग्रामीण व शहरी भागात भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. करण संजय देवतळे यांच्या सूचनेनुसार वरोरा आणि भद्रावती येथे प्रशासकीय आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व दोन्ही तालुक्यातील शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाला धारेवर धरले.
बैठकीतील विभागनिहाय अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा व सादरीकरण:
- ग्रामीण पाणीपुरवठा (वरोरा) :- ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, गावनिहाय पाण्याची उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्या, नादुरुस्त पाणीपुरवठा योजना, विहिरींची सद्यस्थिती आणि आवश्यक टँकरच्या नियोजनाबाबत मा. उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी माहिती सादर केली.
- शहरी पाणीपुरवठा व नगर परिषद (वरोरा व भद्रावती) :- वरोरा आणि भद्रावती शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, पाण्याचे उपलब्ध स्रोत, वितरण व्यवस्था, संभाव्य पाणीटंचाई, आवश्यक दुरुस्ती व पर्यायी पाणीपुरवठा नियोजनाचा आढावा मा. मुख्याधिकारी, नगर परिषद (वरोरा/भद्रावती) व शहरी पाणीपुरवठा अभियंता यांनी घेतला.
- पशुधन व चारा नियोजन :- तालुक्यातील एकूण पशुधन संख्या, उपलब्ध चारा, चारा व पशुखाद्याची संभाव्य गरज, चारा उपलब्धतेची सद्यस्थिती व आगामी काळातील चारा टंचाईवरील उपायांवर मा. तालुका पशुधन विकास अधिकारी / तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
- ग्रामपंचायत स्तरावर चारा लागवड व रोजगार हमी योजना :- ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध शासकीय व सार्वजनिक जमिनींवर चारा लागवड करण्याची शक्यता, रोजगार हमी योजनेतून चारा लागवड आणि ग्रामपंचायतनिहाय नियोजनाबाबत मा. रोजगार हमी योजना संबंधित अधिकारी, पंचायत समिती, वरोरा यांना निर्देश देण्यात आले.
- विभागीय यंत्रणांमार्फत चारा लागवड व संवर्धन: कृषी, सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या उपलब्ध यंत्रणा, शासकीय जमिनी, रोपवाटिका व योजनांचा वापर करून चारा लागवड व संवर्धनाचे नियोजन मा. तालुका कृषी अधिकारी, सामाजिक वनीकरण अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी करावे असे ठरवण्यात आले.
- भूजल पातळी व उपलब्धता :- वरोरा तालुक्यातील सर्व गावांची सद्यस्थितीतील भूजल पातळी, गावनिहाय अद्ययावत डेटा, मागील वर्षाच्या तुलनेतील बदल, भूजल पातळीत लक्षणीय घट झालेली गावे आणि भूजल पुनर्भरणासाठीच्या उपायांवर मा. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संबंधित अधिकारी यांनी माहिती दिली.
- जलसंपदा विभाग :- जलसंपदा विभागाच्या नियंत्रणाखालील जलसाठ्यांची यादी, साठवण क्षमता, सद्यस्थितीतील उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचा वापर, वितरणाचे नियोजन आणि पिण्याच्या पाण्यासाठीआरक्षणाबाबत मा. उप अभियंता, जलसंपदा विभाग यांच्याशी चर्चा झाली.
- जलसंधारण विभाग :- जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जलसाठ्यांची यादी, उपलब्ध पाणीसाठा, साठवण क्षमता, गाळ काढणे, खोलीकरण, दुरुस्ती व इतर जलसंधारणाची कामे आणि प्रस्तावित उपाययोजनांवर मा. उप अभियंता, जलसंधारण विभाग यांनी आढावा घेतला.
- इतर संबंधित अधिकारी (भद्रावती): भद्रावती येथील बैठकीत संवर्ग विकास अधिकारी पं.स. भद्रावती, मा. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती, तालुका कृषी अधिकारी भद्रावती, उप कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, कनिष्ठ भूवैज्ञानिक, उप अभियंता जलसंपदा विभाग, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महावितरण, वन परिक्षेत्र अधिकारी तथा मंडळ अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन सतर्क, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
पाणी व चारा टंचाईच्या समस्येवर वेळीच ठोस उपाययोजना लवकरात लवकर करावे वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्रातील कोणताही शेतकरी अथवा गावामध्ये पाण्याची कमतरता झाली नाही पाहिजे असे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले आहे आपापल्या विभागाचा पाणीटंचाई निवारणाचा सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश या बैठकीतून देण्यात आले आहेत.





