7 November 2026News Website

सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताच्या एकात्मतेचा भक्कम पाया रचणारे राष्ट्रपुरुष – आ. किशोर जोरगेवार

“भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम”

 चंद्रपूर  :- सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर स्वतंत्र भारताच्या एकात्मतेचा भक्कम पाया रचणारे महान राष्ट्रपुरुष होते. स्वातंत्र्यानंतर देशात विखुरलेल्या ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून त्यांनी अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. त्यांची निर्णयक्षमता, कणखर नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.



भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक, भारताच्या राजकीय एकात्मतेचे शिल्पकार आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत  भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार,  महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षा विमल काटकर, कोषाध्यक्ष अमोल शेंडे, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, युवा मोर्चा महामंत्री सतीश तायडे, कार्तिक बोरेवार, ईश्वर वाघमारे, रंजित मातंगी, महेंद्र वाघ, अल्का मेश्राम, वैशाली मद्दीवार, छाया चवरे, रीना साखरकर, सोनाली इटनकर, मनीषा पडगेलवार तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आ. जोरगेवार पुढे म्हणाले कि, आजच्या पिढीने सरदार पटेल यांच्या जीवनातून देश प्रथम, राष्ट्रहित सर्वोच्च आणि राष्ट्रीय एकात्मता सर्वात महत्त्वाची हा विचार आत्मसात करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरव करत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या माध्यमातून त्यांचे स्मरण जागतिक स्तरावर पोहोचविण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांत यापलीकडे जाऊन एकसंध, समर्थ आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया,” असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.



सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

अभिषेक किशोर भागडे