7 November 2026News Website

नागपुरात ‘ॲग्रो व्हिजन २०२६’च्या आयोजन समितीची बैठक; आमदार करण देवतळे यांच्याकडून नितीन गडकरींना विविध प्रश्नांबाबत निवेदन

वरोरा (प्रतिनिधी) :- नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ॲग्रो व्हिजन २०२६’च्या आयोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला वरोरा-भद्रावती विधानसभेचे आमदार करणदादा देवतळे यांनी उपस्थिती लावली.

बैठकीदरम्यान आमदार करण देवतळे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधत त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी या वेळी विशेष चर्चा केली.

येत्या २७ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान नागपूर येथे ‘ॲग्रो व्हिजन’ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग, आणि शेतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनाचा फायदा वरोरा-भद्रावती परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, या दृष्टीनेही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

 

अभिषेक किशोर भागडे