वरोरा येथे आदिवासी सगा समाज कृती समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन
वरोरा :- आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे रक्षण करण्यासाठी आदिवासी सगा समाज कृती समिती, वरोरा यांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ना. अशोकजी उईके यांना एक खरमरीत निवेदन देण्यात आले. “रावण दहन ही आदिवासी समाजाच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेवर झालेली गदा असून ते तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा आदिवासी समाजातील रोष अधिक वाढेल आणि याचे सर्वस्वी गंभीर परिणाम प्रशासनालाच भोगावे लागतील,” असा आक्रमक इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रावण दहनाच्या नावाखाली आदिवासींच्या सांस्कृतिक प्रतिकांचा अवमान होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. रावण दहन परंपरेमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात असून, या अनिष्ट प्रथेला त्वरित आळा घालण्यात यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, समाजाने संयम बाळगला असला तरी त्यांच्या अस्मितेला धक्का पोहोचल्यास समाज रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही.
या आक्रमक शिष्टमंडळात बाळूभाऊ गेडाम (तालुका कार्याध्यक्ष, आदिवासी टायगर सेना वरोरा), चिंतामणजी आत्राम (माजी पंचायत समिती सदस्य, वरोरा), गजानन मेश्राम (माजी नगराध्यक्ष, वरोरा), आनंद गेडाम (तालुका अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद वरोरा) यांच्यासह विलास परचाके, अजय किन्नाके, सतीश गेडाम, कवीश मेश्राम सर, सुरेश मेश्राम सर आणि सूरज पेंदोर हे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवेदनावर शासन आणि प्रशासनाने त्वरित योग्य पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिष्टमंडळातील नेत्यांनी दिला आहे.





