7 November 2026News Website

मौजा शेंबळ येथे फ्लाय ॲशच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त; शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

वरोरा :- वरोरा–वणी महामार्ग NH-930 लगत असलेल्या मौजा शेंबळ येथील सर्व्हे नं. ४६५/१/ब व ४६५/२/ब च्या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲश (राख) टाकली जात असल्याने परिसरात भयंकर धूळ आणि प्रदूषणाचा उद्रेक झाला आहे. या बेकायदेशीर फ्लाय ॲशमुळे परिसरातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होत असून, याप्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित भारतराव निब्रड यांनी दिला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी (SDO) वरोरा यांना निवेदन सादर करण्यात आले.



महामार्गालगतच्या शेतांमध्ये ही राख नक्की कुठल्या थर्मल पॉवर प्लांट किंवा कंपनीतून आणली जात आहे? या जागेवर राख टाकण्याची प्रशासकीय परवानगी आहे का? आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांची पायमल्ली केली जात आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. वाऱ्यामुळे हवेत उडणाऱ्या राखेमुळे शेतातील पिकांवर थरावर थर साचून पिके उद्ध्वस्त होत आहेत, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

  • महसूल, कृषी व प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत जागेची तातडीने संयुक्त पाहणी करावी.
  • राखेचे नमुने तपासून प्रदूषणाची तातडीने पडताळणी करण्यात यावी.
  • प्रदूषणामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा.
  • राखेचा स्रोत (कंपनी), जागेची मालकी आणि परवानगीची कडक चौकशी व्हावी.
  • नियमबाह्य काम आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून राख टाकणे तात्काळ बंद पाडावे.
  • बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य ती भरपाई देण्यात यावी.

“शेतकऱ्यांच्या जीवाशी आणि पिकांशी खेळणाऱ्या भू-माफिया आणि कंपन्यांना शिवसेना गप्प बसू देणार नाही. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाईचा लेखी अहवाल द्यावा; अन्यथा शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल!” अमित निब्रड (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना चंद्रपूर)

यावेळी शिवसेना वरोरा शहराध्यक्ष अतुल नांदे यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर वरोऱ्यात आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

अभिषेक किशोर भागडे