7 November 2026News Website

सावली शहराच्या विकासाला गती: निधी कमी पडू देणार नाही आ. विजय वडेट्टीवार

सावली :- सावली शहराच्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित वेळेत गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही

बैठकीत रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर नागरी सुविधांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंजूर कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि त्यात येणाऱ्या अडचणींची माहिती आ. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. विकासकामे मंजूर होऊनही ती वेळेत पूर्ण होत नसतील, तर त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो, त्यामुळे कसलीही प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला.

 💥 बैठकीतील प्रमुख मुद्दे 💥

  • पाणीपुरवठा व स्वच्छता :- नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना.
  • कामांचा दर्जा :- केवळ निधी खर्च करणे महत्त्वाचे नसून कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे आणि प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
  • प्रस्ताव व पाठपुरावा :- रखडलेली कामे तातडीने मार्गी लावून नवीन विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवण्याचे निर्देश.

विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, असे सांगत सावलीच्या विकासासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यापासून ते कामे पूर्ण होईपर्यंत सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल, असे आ. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. या बैठकीमुळे शहरातील रखडलेल्या कामांना गती मिळण्याची आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या आढावा बैठकीस नगराध्यक्ष साधना वाडी, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार, मुख्याधिकारी शैलेश होनवडजकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितीन गोणे, माजी सभापती विजय कोरेवार, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर यांच्यासह सर्व विभाग सभापती, नगरसेवक आणि नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.

अभिषेक किशोर भागडे