वरोरा :- वरोरा तालुक्यातील साखरा राजापूर येथे ग्रामस्थांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करणाऱ्या एका जुन्या आणि गंभीर समस्येचा अखेर यशस्वी अंत झाला आहे. बाजारपेठ, दवाखाना आणि शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे व बंद अवस्थेत टाकलेला पान ठेला अखेर प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळे हटवण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुख्य रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात तुंबायचे नाल्याचे पाणी, नागरिकांचे हाल
साखरा राजापूर येथील मुख्य रस्त्यावर एका बंद पान ठेल्यामुळे मोठे अतिक्रमण झाले होते. परिणामी, पावसाळ्यात नाल्याचे संपूर्ण पाणी थेट रस्त्यावर साचत असे. यामुळे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, रुग्णांना आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. आरोग्याचा व पर्यावरणाचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन ‘निसर्ग अभ्यासक फाउंडेशन चंद्रपूर’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कैलास निखाडे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली.
डॉ. कैलास निखाडे यांचा सलग एक वर्षाचा पाठपुरावा
गावाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी डॉ. कैलास निखाडे यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली. त्यांनी ग्रामपंचायत साखरा राजापूर, तहसील कार्यालय वरोरा, पंचायत समिती वरोरा आणि जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर या सर्वच प्रशासकीय स्तरावर तब्बल एक वर्ष सətत पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आणि प्रशासनाने यावर कडक ॲक्शन घेण्याचे ठरवले.
पोलिस बंदोबस्तात प्रशासनाची धडक कारवाई
प्रशासनाच्या आदेशानुसार आणि ग्रामपंचायत साखरा राजापूरचे ग्रामविकास अधिकारी श्री. ललित कुमार कन्नाके यांच्या पुढाकाराने सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी कडक पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
पंचायत समिती वरोराकडून नेमण्यात आलेल्या विशेष पथकात श्री. भानोसे साहेब, श्री. अडबाले साहेब आणि विस्तार अधिकारी श्री. राजू कुरेकार यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही कारवाई पार पाडली. साखरा राजापूरच्या इतिहासात अतिक्रमण काढण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे, प्रशासकीय कारवाई कशी होते हे पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने आणि कुतूहलाने उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक
ग्रामविकास अधिकारी श्री. ललित कुमार कन्नाके हे साखरा राजापूर येथे रुजू झाल्यापासून सातत्याने गावाच्या विकासासाठी व हितासाठी धडाडीने काम करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या ऐतिहासिक कारवाईप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पोलिस पाटील श्री. पातुरकर, श्री. दिवाकर निखाडे, श्री. अजय नवघरे, श्री. बुलेट निखाडे, श्री. टेमेश्वर निखाडे, श्री. पाटीलभाऊ यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्ता मोकळा होताच गावात आनंदाचा जल्लोष
अतिक्रमण पूर्णपणे हटवल्यामुळे वर्षांपासून बंद असलेला मुख्य बाजारपेठेचा रस्ता आता सुरळीतपणे सुरू झाला आहे. रस्ता मोकळा झाल्याचे पाहताच गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे. एकजुटीच्या जोरावर आणि योग्य पाठपुराव्यामुळे कशा प्रकारे मोठे प्रश्न सुटू शकतात, याचे उत्तम उदाहरण साखरा राजापूरच्या या घटनेने घालून दिले आहे.





