सायवन, २१ ऑक्टोबर :- आदिवासींचे महान स्वातंत्र्य सेनानी क्रांतीवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सायवन येथे ‘जय सेवा गोटूल जनसेवा संस्था’ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी जनजागृती व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून समाजहिताचा व विकासाचा वसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभियानादरम्यान गावकऱ्यांनी एकत्र येत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. ‘आमचे गाव, सुंदर गाव’ हा संदेश देत सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, आरोग्याची काळजी घेणे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाने आपली व्यक्तिगत जबाबदारी पार पाडणे याबद्दल उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी अशीच एकजूट कायम ठेवण्याचा संकल्प यादरम्यान सोडण्यात आला.
या सामाजिक उपक्रमात जय सेवा गोटूल जनसेवा संस्था सायवनचे पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रफुल शेडमाके, पन्नू गेडाम, अनिल जुमनाके, प्रवीण मेश्राम, पृथ्वीराज कोडापे, मंगेश जुमनाके, अविनाश जुमनाके, गोलू जुमनाके, विलास मेश्राम, मनोहर तलांडे (पोलीस पाटील), बादल अलोने, आणि संस्थाध्यक्षा रक्षिताताई निरंजने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. गावातील तरुणांच्या या आक्रमक व सकारात्मक सहभागामुळे सायवनमध्ये स्वच्छतेचा एक नवा पायंडा पडला आहे.





