भद्रावती :- निवडणूक आयोगाच्या कारभारातील अनियमितता, मतदार यादीतील फेरफार व वोटचोरीच्या मुद्द्याला जबाबदार धरत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भद्रावती काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या निषेधार्थ उद्या, सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात चंद्रपूरच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर प्रामुख्याने उपस्थित राहून आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मतदारांच्या अधिकारांवर होणाऱ्या गदाविरोधात छेडण्यात येणाऱ्या या आंदोलनात भद्रावती शहर व तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी व समविचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भद्रावती शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.





