वरोरा (विशेष प्रतिनिधी) :- वरोरा शहरातील तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका 36 (अंदाजे )वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोपाल रुयारकर वय 36 वर्षे,कॉलरी वार्ड (नवी वस्ती) वरोरा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोपाल रुयारकर हे नेहमीप्रमाणे वरोरा येथील तलावावर मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने तसेच तलावाच्या परिसरात अनपेक्षित शांतता असल्याने संशय बळावला. स्थानिकांनी व नातेवाईकांनी तातडीने तलावाच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली.स्थानिकांच्या व पोलीस विभागाच्या मदतीने पाण्यात शोध घेतला असता, गोपाल रुयारकर यांचा मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच तलावाच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या साहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) रुग्णालयात रवाना केला आहे.
मृत्यूचे मूळ कारण अजूनही अस्पष्ट! गोपाल रुयारकर यांचा मृत्यू अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने झाला, की त्यांना पाण्यात काही त्रास झाला, अथवा यामागे इतर काही कारण आहे ? याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून वरोरा पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.





