वरोरा (विशेष प्रतिनिधी) :- शहरातील गजानन नगर भाग २ (आनंदवन चौक परिसर) येथील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांअभावी दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वरोरा- भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख नागरी समस्या व मागण्या.
- रस्त्यांची दुरवस्था व अपघातांचे प्रमाण :- गजानन नगर भाग २ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि भूमिगत नाल्यांचा पूर्णपणे अभाव आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी व चिखल साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून याचा सर्वाधिक नाहक त्रास लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- साचणारे पाणी व आरोग्याचा धोका :- योग्य निचरा होण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहते आणि सखल भागातील रिकाम्या भूखंडांवर अनेक दिवस साचून राहते. यामुळे परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊन टायफॉईड, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
- ओपन स्पेसचा विकास व सौंदर्यीकरण :- परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठांना फिरण्यासाठी खुली जागा (ओपन स्पेस) उपलब्ध आहे; मात्र प्रशासनाकडून तिचे अद्याप सौंदर्यीकरण करण्यात आलेले नाही. या जागेचा योग्य विकास करण्याची मागणी करण्यात आली.
आमदारांचे सकारात्मक आश्वासन
नागरिकांचे म्हणणे व समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार करणदादा देवतळे यांनी या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली. गजानन नगर भाग २ मधील पक्के रस्ते, नाल्यांची सोय आणि खुल्या जागेचे सौंदर्यीकरण ही कामे संबंधित विभागाकडून लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे सकारात्मक आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले.
निवेदनादरम्यान नागरिकांची उपस्थिती
निवेदन सादर करताना नगरसेवक वर्षाताई पिसाळ, मंजू मसराम, मंजुश्री धात्रक, रक्षा उगे, रंजना नरड, सीमा कांबळे, रुक्मिणी तिराणिक, पूजा मरस्कोल्हे, सीमा मोरे, मनोहर पारोधे, शिरीष उगे, नंदकिशोर मसराम, परमानंद तिराणिक, दिलीप भोगेकर, नितीन धात्रक, नितीन नरड, देवानंद मरस्कोल्हे, भोजराज दडमल, नवकांत कांबळे, सुनील मुत्तलवार, वाराटकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





