वरोरा :- शहरातील गुरुदेव नगर, शिवाजी वार्ड येथील रहिवासी मागील २० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचितांचे जीवन जगत आहेत. गुरुदेव नगरमधील असलेल्या ‘ओपन प्लेस’ (Open Place) या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून तळे साचत असून, या दुर्गंधीयुक्त आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून डायरिया, डेंग्यू, मलेरिया यांसारखे जीवघेणे आजार पावसाळ्यात नागरिकांना जडत आहेत.
या भागातील नगरवासीयांना नगरपरिषदेचे नळाचे पाणी नियमित मिळत नाही. बारकावा पाइपलाईन दुरुस्तीअभावी किंवा इतर कारणांमुळे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी गुरुदेव नगरमधील उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ ‘हँड पंप’ (Hand Pump) बसवून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने येण्या-जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. ही यातायात थांबावी म्हणून टिपले सर यांच्या घरापासून ते रामचंद्र नन्नावरे यांच्या घरापर्यंत अंदाजे २५० मीटर सिमेंट काँक्रीट रोड तयार करावा, संजय काळे यांच्या घरापासून ते सौरभ मेश्राम यांच्या घरापर्यंत अंदाजे ४०० मीटर सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम करण्यात यावे आणि सिडान यांच्या घरापासून ते स्वामी समर्थ मंदिर रोडच्या एका बाजूचे नालीचे बांधकाम तात्काळ करून द्यावे, अशी मागणी गुरुदेव नगर, सुभाष वार्ड येथील रहिवाशांनी केली आहे.
या सर्व गंभीर समस्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सौ. चंद्रकला नरेंद्र मतें, मंगला अनंता बोबडे आणि वंदना घनश्याम खोंडे, सौ. शिल्पा संतोष घोटे, सौ चेताली चेतन जीवतोडे, सौ. वंदना संजय उमरे, सौ. उज्वला राघोबा बोबडे, सौ.अनिता दिनकर चिंचोलकर, सौ. सुलोचना ताजने, सौ.तुराणकर, सौ पल्लवी अनिल देवढे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मागील दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.





