चंद्रपूर (वरोरा) :- जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या बोडखा मोकाशी गावात पट्टेदार वाघाने उच्छाद मांडला असून, या भागात तब्बल तीन वाघ वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या या दहशतीमुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी एक महिन्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार करणदादा देवतळे यांच्या घरावर जनआक्रोश मोर्चा काढला होता. यानंतर खासदार व आमदारांनी जिल्हा वनीकरण अधिकारी (DFO) चंद्रपूर राजेश तलमले यांना वाघाच्या तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश देणारी पत्रे दिली होती. परंतु, एक महिना उलटूनही वनविभागाने या पत्राला निव्वळ ‘केराची टोपली’ दाखवल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांमध्ये जीव मुठीत धरून जगण्याची वेळ एक महिन्याचा कालावधी लोटला तरी वनविभागाला वाघाला जेरबंद करण्यात अपयश आले आहे. या काळात वाघाने दोन बकऱ्यांवर हल्ला केला असून, दोन व्यक्तींवरही हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असे असताना ही वरोरा आणि चंद्रपूर वनविभाकडून गावकऱ्यांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. आज पुन्हा बोडखा येथील शेतशिवारात नाल्या लगत वाघाचे पगमार्क (पावलाचे ठसे) दिसून आले असून वाघाची डरकाळी ऐकू आल्याने शेतकरी व शेतमजूर प्रचंड भयभीत झाले आहेत. या बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे व शेती करणे अत्यंत अवघड झाले आहे.
प्रशासन विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप; आंदोलनाचा इशारा एका महिन्यापासून चंद्रपूर वनविभागाकडून वाघाला जेरबंद करण्यासाठी आणि पकडण्याची परवानगी मिळण्यास दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांचा रोष अनावर झाला आहे. वनविभागाने लोकप्रतिनिधींच्या पत्राची साधी दखलही घेतली नाही, त्यामुळे आता हतबल झालेल्या बोडखा ग्रामवासियांनी न्याय मागण्यासाठी नक्की कुणाकडे धाव घ्यावी, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
येत्या दोन दिवसांत या नरभक्षी वाघाला जेरबंद न केल्यास, थेट वरोरा वन विभाग कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा बोडखा ग्रामस्थांनी दिला आहे. याउलट, उद्या जर कुठल्याही ग्रामस्थाची जीवितहानी झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी चंद्रपूर व वरोराच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांची असेल, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला आहे.





