8 November 2026News Website

वरोरा व भद्रावतीत पर्यावरण आणि संस्कृतीचा संगम! घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे विजयी मानकरी जाहीर

वरोरा :- गणेशोत्सवाच्या धामधुमीत बाप्पाच्या भक्तीसोबतच कला आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडवणाऱ्या ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे’ निकाल जाहीर झाले असून, पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या सजावटींनी यंदाच्या स्पर्धेत विशेष मान मिळवला आहे. वरोरा- भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे, सौ. वेदांती करण देवतळे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉ. भगवान गायकवाड, विजय मोकाशी,राजेंद्र सवई, अनिकेत नाकाडे, किशोर बावणे  व इतर पदाधिकारी,संपूर्ण नगर सेवक, आघाडीच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

🏆 प्रथम क्रमांक: कु. प्रत्युष संजय आसुटकर (विनायक लेआउट, वरोरा)

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून स्वतः गणपतीची मूर्ती साकारणाऱ्या प्रत्युष आसुटकर यांनी यंदा ६ वी मूर्ती साकारत सर्वांचे वेधले वेधले. यंदाच्या स्पर्धेत त्यांनी “योग्य पोषण, देश रोशन” हा अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दिला. फळे-भाज्यांचे महत्त्व आणि जंक फूडचे दुष्परिणाम सजावटीतून प्रभावीपणे मांडत त्यांनी प्लास्टिक व थर्माकोलचा शून्य वापर करून संपूर्ण पर्यावरणपूरक सजावट साकारली. त्यांच्या या कल्पकतेला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे.

🥈 द्वितीय क्रमांक: श्री. पांडुरंग नामदेव कुट्टरमारे (बापापूर, वरोरा)

“डोंगरदऱ्यांमधून पंढरीच्या वाटेवर” या देखण्या संकल्पनेतून पांडुरंग कुट्टरमारे यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. डोंगरदऱ्यांमधून मार्गक्रमण करणारे वारकरी, भव्य धबधबे आणि निसर्गरम्य वातावरणाचा सुंदर मिलाफ त्यांनी यात घडवला. विशेष म्हणजे, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून तयार केलेला हा देखावा निसर्ग, भक्ती आणि कल्पकतेचा अप्रतिम संगम ठरला, ज्याने द्वितीय क्रमांक पटकावला.

🥉 तृतीय क्रमांक: सौ. रेणुका दिनेश गायकवाड (संताजी नगर, भद्रावती)

भद्रावतीच्या सौ. रेणुका गायकवाड यांनी “जय मल्हार – सोन्याची जेजुरी” या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित खंडोबा मंदिराची सुंदर प्रतिकृती साकारली. सोन्याची आकर्षक सजावट, भगवे ध्वज आणि फुलांची देखणी आरास यामुळे या देखाव्यातून भक्ती, परंपरा आणि कलात्मकतेचा सोहळाच पाहायला मिळाला. त्यांच्या या उत्कृष्ट कलाकृतीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 यंदाच्या स्पर्धेत सहभागींनी प्लास्टिकमुक्ती, पर्यावरणपूरकता आणि सामाजिक प्रबोधनाचे दिलेले संदेश संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहेत.

 

अभिषेक किशोर भागडे