Home जिल्हा बोडखा (मो) वासियांचा रोष! ग्रामस्थांचे थेट आमदारांच्या दरबारात धडक; वाघाच्या दहशतीमुळे गावात...

बोडखा (मो) वासियांचा रोष! ग्रामस्थांचे थेट आमदारांच्या दरबारात धडक; वाघाच्या दहशतीमुळे गावात भीतीचे वातावरण.

वरोरा :-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या ‘पुष्पांजली’ निवासस्थानी आज मौजा बोडखा (मो) येथील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. गावावर पसरलेली नरभक्षक वाघाची दहशत, वारंवार होणारे वन्यजीवांचे हल्ले, नागरिकांचा झालेला दुर्दैवी जखमी प्रसंग आणि शेती-शिवारामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना या गंभीर प्रश्नांना घेऊन तब्बल १०० ते १२० महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी आमदारांच्या भेटीसाठी धडकले.
गेल्या काही दिवसांत बोडखा (मो) परिसरात वाघाच्या मुक्त संचारामुळे संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे. दिवसाढवळ्या वाघ वावरत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे मुश्कील झाले असून नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी आपली आपबीती आमदार करणदादा देवतळे यांच्यासमोर मांडत संताप आणि चिंता व्यक्त केली.



💥 आमदारांचा थेट अधिकाऱ्यांना दणका💥
ग्रामस्थांची बिकट परिस्थिती आणि भीती लक्षात घेताच आमदार करणदादा देवतळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी वन विभागाचे डीएफओ राजन तलमले यांच्याशी फोनवर थेट चर्चा केली आणि बोडखा (मो) परिसरातील जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला.
आमदार देवतळे यांनी डीएफओ तलमले यांना सक्त निर्देश देत स्पष्ट केले की, “येत्या दोन ते तीन दिवसांच्या आत वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.” ग्रामस्थांच्या जिवाशी खेळ सहन केला जाणार नाही, असा सज्जड दम भरत त्यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार देवतळे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि तत्पर हस्तक्षेपाने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जोपर्यंत वाघ जेरबंद होत नाही, तोपर्यंत बोडखा (मो) मधील नागरिकांचा जीव मुठीतच असणार आहे. वन विभागाने आता तरी गांभीर्याने पावले उचलून लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी संपूर्ण परिसरात होत आहे.