वरोरा :-वरोरा नजीकच्या सलोरी येथे एका किराणा जनरल स्टोर्सला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग इतकी भयंकर होती की दुकानातील लाखो रुपयांचा किराणा माल जळून पूर्णपणे खाक झाला आहे. मात्र, वरोरा नगरपालिकेच्या यंत्रणेची तत्परता, नागरिकांचे आणि स्थानिक तरुणांचे धाडस यामुळे वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, अन्यथा मोठी जीवितहानी टळली असती.सलोरी येथील रहिवासी नामदेव बापूराव तुमसरे यांच्या घराला लागूनच असलेल्या किराणा जनरल स्टोर्स आहे. अचानक शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणामुळे या दुकानात आगीने वेढा घेतला. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले आणि दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक होऊ लागला. आगीचे लोळ आणि काळे ढग पाहून परिसरात दहशत पसरली, कारण दुकान थेट घराला लागून असल्यामुळे आग घरापर्यंत पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
नगरपालिका आणि स्थानिक तरुणांची सतर्कता ठरली तारणहार.
आगीची माहिती मिळताच वरोरा नगरपालिकेची यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. या आपत्कालीन परिस्थितीत रवि बरसे, निलेश तवाडे, मनोज व बादल गज्जलवार या स्थानिक तरुण व नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे आग विझवण्यास मोठी मदत मिळाली. नगरपालिका प्रशासनाच्या दमनकल व तत्पर कारवाईमुळे आग आजूबाजूच्या घरांपर्यंत पोहचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली.
या दुर्दैवी आगीत किराणामालाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असले, तरी सतर्क नागरिकांमुळे आणि नगरपालिकेच्या वेगवान भूमिकेमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाकडून या आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.




