वरोरा :-मोठा गुन्हा किंवा खुनाचा कट रचण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत धडक व धडाकेबाज कारवाई करत जेरबंद केले आहे. नागपंचमी सणानिमित्त गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपीच्या घरातून पिस्तूल, दोन मॅग्झीन आणि १० जीवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वरोरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अशी झाली कारवाई :- दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमी सणानिमित्त पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरोरा डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. दरम्यान, पोलीस स्टेशन वरोरा परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की, सत्यम टॉकीजच्या मागे, वड्डार वस्ती, वरोरा येथे राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने (वय ४६ वर्षे) हा कुठल्यातरी गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा (खुनाचा कट) करण्याच्या तयारीत आहे. या उद्देशाने त्याने त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगून ठेवले आहे.
या अत्यंत खात्रीशीर माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ वड्डार वस्ती गाठून आरोपीच्या घरात पंचांसमोर धाड टाकली. झडती घेतली असता, त्याच्या घरातून एक पिस्तूल, दोन मॅग्झीन व १० जीवंत काडतुसे असा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
८९ हजारांचा मुद्देमाल जप्त व गुन्हा दाखल
पोलिसांनी अग्निशस्त्रासह आरोपीचा मोबाईल असा एकूण ८९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक ९०२/२०२६, कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा (Arms Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
🙏 पोलिसांची उच्चस्तरीय कारवाई 🙏
सदरची धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी , अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कांग्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शस्त्र बाळगून घातपाताचा कट रचणाऱ्या या गुन्हेगाराला एलसीबीने अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे.




