Home विदर्भ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही – आ. राजूभाऊ...

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही – आ. राजूभाऊ तोडसाम

गडचिरोली :- आश्रमशाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र, परंतु धानोरा तालुक्यातील गिरोला येथील माध्यमिक आश्रमशाळेतील धक्कादायक वास्तव पाहून आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आश्रमशाळेची अचानक पाहणी करत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला असता, तेथील मूलभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षणातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.



🙏 साबण-तेलासाठीही विद्यार्थ्यांची वंचना 🙏
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आमदारांसमोर आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, दैनंदिन वापराच्या साबण आणि तेलासारख्या अत्यंत मूलभूत वस्तू त्यांना महिन्यातून केवळ एकदाच पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे संतापलेल्या आमदार तोडसाम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कागदोपत्री अहवाल चकाचक असताना प्रत्यक्ष व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती दर्शवली.



🙏 गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्पष्ट तंबी 🙏
केवळ निवासाची व्यवस्था करून आश्रमशाळेची जबाबदारी संपत नाही, तर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषक वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे प्रतिपादन आमदार तोडसाम यांनी केले. नियमित अध्यापन होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी कडक तंबी त्यांनी प्रशासनाला दिली.



‘मी स्वतः विद्यार्थ्यांच्या पाठीशी’
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने त्वरित सुधारणा न केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. या अचानक भेटीमुळे आश्रमशाळा प्रशासनात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.“विद्यार्थ्यांची शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या तीनही बाबी सर्वोच्च प्राधान्याच्या आहेत. कागदी घोडे नाचवून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बळी दिला जात असेल, तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला हक्काच्या आणि दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत.