Home Breaking News वरोऱ्यात ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्याचा डाव हाणून पाडणार! पाणी पुरवठा खर्चाच्या मुद्यावर...

वरोऱ्यात ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्याचा डाव हाणून पाडणार! पाणी पुरवठा खर्चाच्या मुद्यावर भाजप गटनेते अक्षय भिवदरे यांचा तीव्र आक्रमक पवित्रा.

वरोरा :- वरोरा नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचा खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यास मंजुरी देण्याचा वादग्रस्त विषय बहुमताच्या जोरावर रेटण्यात आला. मात्र,या मध्ये विरोधी गटातर्फे तेरा ही नगरसेवकांचा विरोध दर्शवला होता.आता या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाचे विरोधी गटनेते तथा शिवसेना शिंदे गटाचे सर्व व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक  अक्षय भिवदरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे.



💥 नेमका वाद काय ?
सभेसमोर आलेल्या विषयानुसार, वरोरा नगरपरिषद पाणी पुरवठा योजना व वितरण व्यवस्था देखभाल दुरुस्तीसाठी (दि. १०/१०/२०२४ पासून ३ वर्षांकरिता) तब्बल २ कोटी ५२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रचंड खर्च नगरपरिषद निधीतून करणे अशक्य असल्याने, आता थेट १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीतून हा खर्च भागवण्याचा घाट घातला जात आहे.
अक्षय भिवदरे यांचा घणाघाती आरोप
या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत भाजप गटनेते अक्षय भिवदरे यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. “हा नवीन व विकासकामांचा निधी असून, याचा वापर शहराच्या नवीन कामांसाठी व्हायला हवा; परंतु या निधीचा सर्रास गैरवापर करून केवळ जुनी बिले चुकती केली जात आहेत आणि याद्वारे ठराविक ठेकेदारांचे घर भरण्याचे काम सुरू आहे ,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
सामान्य जनतेच्या करातून जमा होणाऱ्या आणि विकासासाठी मिळणाऱ्या निधीची अशा प्रकारे उधळपट्टी करून जुनी देयके अदा करणे व ठेकेदारांचे उखळ पांढरे करणे शहरवासीयांच्या फसवणुकीचे असल्याचा आरोप करत, अक्षय भिवदरे यांनी या मनमानी कारभाराविरुद्ध जोरदार बंड पुकारले आहे. बहुमताच्या बळावर हा ठराव पारित झाला असला, तरी जनतेच्या पैशाचा गैरवापर कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला असून या मुद्द्यावरून वरोराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.