भद्रावती :-विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र क्र. ४२२७ येथे विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. मुक्त शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविणाऱ्या विद्यापीठाच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यासकेंद्रप्रमुख डॉ. नामदेव उमाटे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये अभ्यासकेंद्राचे केंद्र समन्वयक डॉ. यशवंत घुमे, अरविंद विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्रीती क्षीरसागर, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. संगीता बांबोडे, इतिहास विभागप्रमुख प्रा. जयवंत काकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना आणि ग्रामीण, नोकरदार, महिला तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त शिक्षण व्यवस्थेने उघडलेली नवी क्षितिजे यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बदलत्या काळात कौशल्याधारित आणि लवचिक शिक्षणव्यवस्थेची गरज अधोरेखित करत विद्यापीठ समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे मत यावेळी प्राचार्य डॉ उमाटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभ्यासकेंद्राचे सहसमन्वयक आशीष दुपारे यांनी केले. कार्यक्रमास कार्यालय प्रमुख दीपक तेलंग, समंत्रक संघपाल वेले, प्रा. श्रीकृष्ण शिंदे, आशीष चौखे, विजया साव, संजय तामगाडगे यांचेसह अभ्यासकेंद्राचे माजी विद्यार्थी, समुपदेशक, निमंत्रित पाहुणे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, अभिमान आणि ज्ञानसेवेचा संदेश देणाऱ्या या वर्धापन दिन सोहळ्याने उपस्थितांना मुक्त शिक्षणाच्या व्यापक कार्याची नव्याने जाणीव करून दिली.




