Home जिल्हा रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; ५ शाळांना दिले वॉटर फिल्टर; विद्यार्थ्यांची पिण्याच्या...

रोटरी क्लब वरोराचा स्तुत्य उपक्रम; ५ शाळांना दिले वॉटर फिल्टर; विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय

वरोरा :- विद्यार्थ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, या उदात्त हेतूने ‘रोटरी क्लब ऑफ वरोरा’ने सामाजिक जबाबदारीचे भान राखत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रोटरी क्लबच्या वतीने वरोरा परिसरातील ५ शाळा आणि संस्थांना अत्याधुनिक वॉटर फिल्टर भेट स्वरूपात देण्यात आले आहेत.
या उपक्रमाची सुरुवात सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय, खांबाडा येथे करण्यात आली. रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी रोटरीचे पदाधिकारी अभिजीत मणियार, अभिजीत बोथले आणि सुनील आयचीत यांची प्रमुख उपस्थिती होती.




💠 विद्यार्थ्यांचे आरोग्य रक्षण हेच ध्येय 💠
कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष योगेश डोंगरवार म्हणाले की, “स्वच्छ पाणी ही आरोग्याची पहिली पायरी आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी रोटरी क्लब कटिबद्ध आहे.”
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. पारोधे यांच्यासह शिक्षक एम.एन. धोटे, व्ही.एस. जुमनाके, टी.एस. पाचभाई आणि एन.के. खिरटकर उपस्थित होते. शाळेसाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण मदतीबद्दल विद्यालय प्रशासनाने रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.




💠 या संस्थांना मिळाला लाभ 💠
रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमांतर्गत एकूण ५ ठिकाणी विनामूल्य वॉटर फिल्टर बसवण्यात आले आहेत:
👉  छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, खांबाडा.
👉  जिल्हा परिषद शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, वरोरा.
👉  जिल्हा परिषद शाळा, बोथली.
👉  अरविंद विद्या निकेतन, वरोरा.
👉  श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान, वरोरा.
रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबवलेला हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.