भद्रावती :- दि. २४ भविष्यात आयएएस, आयपीएस अधिकारी, डॉक्टर किंवा संशोधक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिलभद्र मंडळातर्फे आयोजित उन्हाळी शिबिर एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी शहरातील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.
💠 अधिकाऱ्यांकडून मिळाले धडे 💠
दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांना भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली.
💠 प्रशासकीय मार्गदर्शन 💠
बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षांचे स्वरूप आणि त्यासाठी लागणाऱ्या तयारीचे सविस्तर मार्गदर्शन केले.
💠 नगरपरिषदेचे कामकाज 💠
मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी आणि विजयकुमार जांभूळकर यांनी नगरपरिषदेच्या विविध विभागांची माहिती दिली.
💠 सुरक्षेचे धडे 💠
ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना, मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि ज्येष्ठांचा आदर करण्याचे आवाहन केले.
💠 महसूल विभागाची माहिती 💠
तहसीलदार राजेश भांडारकर आणि महसूल सहाय्यक प्रज्योत येडे यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांचे कार्य स्पष्ट केले.
💠 आरोग्यसेवा 💠
डॉ. विवेक शिंदे यांनी डॉक्टर होण्यासाठी लागणारी मेहनत आणि मानवसेवेचे महत्त्व विषद केले.
💠 प्रत्यक्ष प्रकल्पांची पाहणी 💠
केवळ कार्यालयांना भेटी न देता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पांची पाहणी केली. शहराला होणारा पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी जवळून पाहिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवडीसाठी लागणारा आत्मविश्वास मिळाला आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी प्रवीण चिमुरकर आणि शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या भेटींमधून मिळालेले अनुभव विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीत नक्कीच दिशादर्शक ठरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




