Home जिल्हा वरोरा नगरपरिषदेचा निष्काळजीपणा: मालवीय वॉर्डमध्ये मृत्यूचा सापळा; प्रशासनाचे दुर्लक्ष

वरोरा नगरपरिषदेचा निष्काळजीपणा: मालवीय वॉर्डमध्ये मृत्यूचा सापळा; प्रशासनाचे दुर्लक्ष

वरोरा :- शहरातील मालवीय वॉर्ड परिसरात नगरपरिषदेने खोदलेली उघडी आणि खोल नाली आता स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे. व्होल्टास कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या या धोकादायक नालीमुळे अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला असूनही, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.




जीवघेणा धोका, प्रशासनाची शांतता
युवासेना शहर प्रमुख चेतन रामू सातपुते यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, जेसीबीच्या सहाय्याने ही नाली अत्यंत खोल खणण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नालीला लागूनच सार्वजनिक रस्ता आहे, मात्र सुरक्षिततेसाठी कोणतीही संरक्षण भिंत, रेलिंग किंवा बॅरिकेड्स लावलेले नाहीत. आता पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने नालीत पाणी साचले असून, तिचा नेमका विस्तार आणि खोली समजणे कठीण झाले आहे.




अपघातांना निमंत्रण
या भागात वावरणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच जिवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांचे नियंत्रण सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. अशा परिस्थितीत भविष्यात होणाऱ्या कोणत्याही जीवितहानीस किंवा दुर्घटनेस संपूर्णपणे नगरपरिषदेचा निष्काळजीपणाच जबाबदार असेल, असा इशारा स्थानिक रहिवाशांकडून देण्यात येत आहे.




तात्काळ उपाययोजनेची मागणी
प्रशासनाने तातडीने या ठिकाणाची पाहणी करून संरक्षण भिंत किंवा रेलिंग उभारावी, तसेच बॅरिकेड्स आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. नगरपरिषद आता यावर कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे संपूर्ण वॉर्डच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदन देते वेळी उपतालुकाप्रमुख सागर नरशेट्टीवार, शहर अध्यक्ष चेतन सातपुते,अमित घोडमारे मनीष नंदनवार सह शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.