वरोरा :- मौजा खंबाडा निसर्गाच्या लहरीपणाचा आणि काळाचा असा काही क्रूर खेळ घडला की, एका तरुण शेतकऱ्याचा विचारही न करता बळी घेतला. मौजा खंबाळा येथे आज सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून धीरज वाल्मीक जोगे (वय २२) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने खंबाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जोगे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे आटोपून घरी परतण्याच्या तयारीत होता. दरम्यान, अचानक वातावरणात बदल होऊन ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. ही नैसर्गिक आपत्ती इतकी भीषण होती की, धीरजला सावरण्याची संधीही मिळाली नाही. अचानक पडलेल्या विजेच्या तडाख्यात सापडून धीरजचा जागीच मृत्यू झाला.
तरुण जिवाचा अंत
अवघ्या २२ व्या वर्षी आपल्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या आणि शेतीमध्ये कबाड कष्ट करणाऱ्या धीरजच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक तरुण, उमदा आणि कष्टाळू मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्याने जोगे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या दुर्दैवी घटनेबाबत प्रशासनाकडून मृताच्या कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.




