निर्भीड पत्रकारितेचा गळा घोटण्याच ?
वर्धा/सिंदी (रेल्वे):-सत्य मांडणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा केला जातो, याचा संतापजनक प्रकार सिंदी (रेल्वे) येथे समोर आला आहे. ‘दैनिक हिंदू जागर’चे मुख्य संपादक रोशन ठाकूर यांनी पोलीस स्टेशनमधील कथित गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर, सूडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जिल्हाभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
👇नेमके प्रकरण काय 👇
सिंदी (रेल्वे) पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र निसवाडे आणि हेड कॉन्स्टेबल धनराज सयाम यांच्या कार्यकाळातील कथित गैरप्रकारांबाबत ‘दैनिक हिंदू जागर’ने सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बातम्या थांबवण्यासाठी रोशन ठाकूर यांना विविध प्रकारची आमिषे दाखवण्यात आली होती. मात्र, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी आपली लेखणी निर्भीडपणे सुरूच ठेवली. ‘मॅनेज’ न झाल्याचा राग मनात धरूनच हा खोटा गुन्हा दाखल केल्याची चर्चा आता जोर धरत आहे.
👉 पोलिसांचा थेट पत्रकाराच्या घरी ‘दबाव’
एवढ्यावरच न थांबता, ठाणेदार नरेंद्र निसवाडे स्वतः ३ ते ४ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन रोशन ठाकूर यांच्या घरी पोहोचले होते. सुदैवाने ठाकूर यावेळी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, अशा प्रकारे पोलिसांचा फौजफाटा पत्रकाराच्या घरी पाठवणे, हा केवळ दबाव टाकण्याचा आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ही लेखणी विकत नाही, ही लेखणी वाकत नाही !
या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना रोशन ठाकूर यांनी ठणकावून सांगितले की, “सत्य मांडल्याची ही किंमत असेल, तर ती चुकायला आम्ही तयार आहोत. ही लेखणी सत्यासाठी लढते आणि यापुढेही जनतेचा आवाज बनून निर्भीडपणे उभी राहणार आहे.
👉 पत्रकार संघटना आक्रमक होणार ?
एका बाजूला शासन पत्रकारांच्या संरक्षणाचे कायदे करते, तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन अशा प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
ब्युरो रिपोर्ट: स्वतंत्र विदर्भ न्यूज. पोर्टल,वरोरा
🙏 जय विदर्भ 🙏




