चंद्रपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी तर मनपा स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले.
मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान वेळेचे नियोजन, खेळाडूंच्या सुविधा आणि सामन्यांच्या आयोजनाबाबत काही प्रश्न उपस्थित झाले. नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा पार पडण्याऐवजी काही सामने रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याचे दिसून आले. काही सामने रात्री सुमारे ११.३० वाजेपर्यंत सुरू असल्याने दूरवरून आलेल्या खेळाडूंना परतीच्या प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
विशेषत :– स्पर्धेत मुलींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरू ठेवताना त्यांच्या सुरक्षित परतीसाठी योग्य व्यवस्था असणे आवश्यक होते. मात्र, स्वतंत्र वाहतूक अथवा परतीची व्यवस्था उपलब्ध होती का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
💥 खेळाडूंच्या सुविधांबाबतही प्रश्न 💥 स्पर्धास्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मर्यादित असल्याचे काही उपस्थितांनी सांगितले. तसेच हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता व गर्दी असल्यामुळे खेळाडूंना अस्वस्थ वातावरणाचा सामना करावा लागल्याचेही सांगण्यात आले. अशा परिस्थितीत खेळाडूंच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
💥 पंचांच्या निर्णय व स्कोअरिंगबाबत प्रश्न 💥
याशिवाय काही सामन्यांमध्ये पंचांचे निर्णय व स्कोअरिंगच्या पद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित झाले. पंच म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींच्या पात्रतेबाबतही स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे काही खेळाडू व पालकांचे म्हणणे आहे.
विशेषत :– १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांकडून खेळाडू म्हणून सहभागी होत असतानाच पंचाची भूमिका पार पाडली जात असल्यास, संबंधित नियमांनुसार त्याची वैधता काय आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आवश्यक आहे.
मॅटवरून न उठल्यास विभागीय स्पर्धेत न पाठविण्याची धमकी ? स्पर्धेदरम्यान मॅनेजमेंटकडून काही खेळाडूंना “मॅटवरून उठला नाहीत तर विभागीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार नाही”, अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोपही काहींकडून करण्यात आला आहे. हा आरोप संबंधितांकडून अधिकृतरीत्या स्पष्ट होणे आवश्यक असून, खेळाडूंच्या निवडीवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला गेला होता का, याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. विभागीय स्तरावर निवड होणे हे विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याशी संबंधित असल्याने, निवड प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध आणि कोणत्याही दबावापासून मुक्त असणे अपेक्षित आहे.
💥 आयोजनाबाबत पारदर्शकता आवश्यक 💥शालेय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याशी संबंधित असल्याने अधिकृत व पात्र पंचांची नियुक्ती, निष्पक्ष स्कोअरिंग, योग्य वेळेचे नियोजन, पुरेसे पाणी, खेळाडूंसाठी योग्य वातावरण, सुरक्षित परतीची व्यवस्था आणि पारदर्शक निवड प्रक्रिया यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.या सर्व बाबींवर संबंधित आयोजक व प्रशासनाने आवश्यक स्पष्टीकरण देऊन भविष्यात अशा समस्या उद्भवणार नाहीत यासाठी योग्य उपाययोजना करणे अपेक्षित आहे.




