सावली (चंद्रपूर) :- शब्द, भावना आणि प्रतिभेचा त्रिवेणी संगम असलेल्या सावलीच्या मातीत साहित्याचा नवा इतिहास रचला गेला. निमित्त होते ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. चंद्रपूर’च्या सावली शाखेच्या १३ व्या वर्धापनदिनाचे! या विशेष दिनाचे औचित्य साधत आयोजित भव्य कवी संमेलनाने संपूर्ण सावली तालुक्यात साहित्यिक चैतन्य निर्माण केले. या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते रोहितभाऊ बोमतवार यांनी उपस्थित राहून कवी व उपस्थितांचा उत्साह वाढवला.
ग्रामीण भागातील नवोदित व ज्येष्ठ कवींना एक हक्काचे आणि मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत स्थानिक साहित्य, कला आणि संस्कृतीला बळ देण्याचे स्तुत्य कार्य या संस्थेने केले आहे. या संमेलनात कवींनी आपल्या बहारदार कवितांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, राजकीय घडामोडी, निसर्गाचे रूप आणि मानवी जीवनातील विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले. उपस्थितांना खिळवून ठेवणाऱ्या या सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली यावेळी रोहित बोमतवार यांनी व्यक्त केलेले मनोगत
“कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून समाजाच्या भावना, वेदना, आनंद आणि वास्तवाला मिळालेला जिवंत आवाज आहे. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील छुप्या प्रतिभेला नवी ओळख मिळते, याचा मला विशेष आनंद आहे.”
🙏 मान्यवरांची विशेष उपस्थिती 🙏
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक दिग्गज व प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली होती.
अध्यक्षा :- काव्यलेखिका श्रीमती वृंदाताई पगडपल्लीवार
पमुख अतिथी :- श्री. प्रकाशकाका गड्डमवार (भाजपा ज्येष्ठ नेते तथा सहकार भारती सावली तालुकाध्यक्ष)
विशेष उपस्थिती :- श्री. उदयजी गडकरी (लोकमत तालुका प्रतिनिधी), श्रीमती अंजलीताई दमके (सामाजिक कार्यकर्त्या)
आयोजक व पदाधिकारी :- श्री. चरणदासजी बोम्मावार सर (अध्यक्ष, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी), श्री. सुरजजी बोम्मावार (शाखा व्यवस्थापक), श्री. प्रफुलजी तुम्मेवार (ज्येष्ठ कवी)
तसेच संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी, कर्मचारी आणि सावली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा वर्धापन दिन सोहळा सावलीच्या सांस्कृतिक पटलावर एक सुवर्णअध्याय म्हणून कायमचा कोरला गेला आहे.




