वणी :- बाबापूर गावाची श्रद्धा आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबापूरच्या गणपती बाप्पाच्या महिमेवर आधारित ‘या बाबापूरची शान गणपती गणराया’ या नवीन भक्तिगीताचे शूटिंग नुकतेच मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी झालेल्या या गाण्याच्या शूटिंगला तब्बल १ हजारांहून अधिक भाविक, कलाकार आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बाबापूर परिसरातील गणपती बाप्पावरील श्रद्धा, भक्ती आणि गावाची धार्मिक परंपरा या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
या गाण्याच्या शूटिंगदरम्यान १० ते १५ गावांतील भजन, हरिपाठ तसेच वाणी येथील श्री छत्रपती ढोल पथकाने विशेष सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण शूटिंगस्थळी भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या भक्तिगीताची निर्मिती विलास झटे यांनी केली असून, मुख्य भूमिका विलास झटे (साधा माणूस) यांनी साकारली आहे. गाण्याचे दिग्दर्शन रवी वानखडे, बोल महेश बेंडें, नृत्य दिग्दर्शन जतीन राऊत तर छायाचित्रण राज भांगडे यांनी केले आहे.
बाबापूरच्या गणरायाची महती, गावकऱ्यांची अखंड श्रद्धा आणि भक्तिभाव यांचे सुंदर दर्शन या गाण्यातून प्रेक्षकांना घडणार आहे. गाण्यातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या गाण्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
१४ सप्टेंबरला होणार गाणे प्रदर्शित
गणेश चतुर्थीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून १४ सप्टेंबर रोजी रात्री ठीक ८ वाजता हे भक्तिगीत Vilas Zatte (Namune Production) या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
बाबापूरच्या गणरायावरील श्रद्धा आणि भक्तीचा अनुभव देणाऱ्या या गाण्याची संपूर्ण बाबापूर ग्रामवासी, भाविक भक्त आणि गणेशप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.




