चंद्रपूर :- कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील नवोदित प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस.के. फिल्म प्रोडक्शन, चंद्रपूर यांच्या वतीने माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील्स स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या कलाक्षेत्राला नवी दिशा देतानाच ‘चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल – ऑल इंडिया २०२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
या स्पर्धेला चंद्रपूरसह विविध जिल्ह्यांमधून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ७० शॉर्ट फिल्म्स या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या. या सर्व कलाकृतींचे परीक्षण मा. सौ. जयश्री कापसे मॅडम यांनी केले. त्यांच्या निष्पक्ष परीक्षणातून उत्कृष्ट तीन शॉर्ट फिल्म्सची निवड करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या सर्व ७० शॉर्ट फिल्म्सच्या विशेष स्क्रीनिंगने झाली. मोठ्या पडद्यावर स्वतःची कलाकृती मान्यवर आणि प्रेक्षकांसमोर पाहण्याची संधी मिळाल्याने अनेक नवोदित कलाकार, दिग्दर्शक आणि फिल्ममेकर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विशेष लक्षवेधी ठरला. “एस.के. फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून आमची कलाकृती मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली,” अशा भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केल्या. हा अनुभव त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
मुख्य कार्यक्रमात एस.के. फिल्म प्रोडक्शनच्या वतीने मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी देवा बुरडकर, प्रीतम खोब्रागडे आणि सुदेश भालेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमस्थळी केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, स्पर्धक, कलाकार, फिल्ममेकर आणि सहकाऱ्यांनी सुधीरभाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा होणे, ही या कार्यक्रमाची विशेष भावनिक आणि आनंददायी बाब ठरली.विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या तब्बल ७० स्पर्धकांचा मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. प्रत्येक स्पर्धकाला मोमेंटो, सहभाग प्रमाणपत्र आणि विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी कलाकारांच्या कलेचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष कौतुकाचा विषय ठरला.
‘विकास का संकल्प’ ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी
स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा मा. सौ. जयश्री कापसे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रथम पुरस्कार – संतोष यांगडलवार – ‘विकास का संकल्प’
द्वितीय पुरस्कार – शिव त्रीनगरवार – ‘एक फैसले की ताकद’
तृतीय पुरस्कार – अक्षय धानोरकर – ‘समय का पहिया’
यानंतर मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते विजेत्यांना मोमेंटो, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिकाचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही विशेष ‘कार्यगौरव पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. मा. प्रशांतजी काक्कड, गणेश साळवे, छायाचित्रकार संस्था, चंद्रपूर आणि हेमन्त गुहे यांचा मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून देवा बुरडकर यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासदृष्टीचा आणि चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. चंद्रपूरमध्ये कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्राला मोठे व्यासपीठ मिळावे, नवोदित कलाकारांना संधी मिळावी आणि स्थानिक प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०२७ मध्ये ‘चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल – ऑल इंडिया २०२७’चा संकल्प
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त २०२७ मध्ये ‘चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल – ऑल इंडिया २०२७’ आयोजित करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प देवा बुरडकर यांनी यावेळी व्यक्त केला. या संकल्पाला मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूरमधील नवोदित कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. चंद्रपूरमधील प्रतिभावान युवकांना केवळ जिल्हा किंवा राज्याच्या पातळीवर मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
**‘चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल – ऑल इंडिया २०२७’**च्या संकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
एस.के. फिल्म प्रोडक्शनच्या या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नवोदित दिग्दर्शक, कलाकार, लेखक, तंत्रज्ञ, फोटोग्राफर आणि फिल्ममेकर यांना नव्या संधींचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. केवळ स्पर्धा आणि पुरस्कारापुरता मर्यादित न राहता, स्थानिक कलागुणांना मोठ्या पडद्यावर आणण्याचा आणि त्यांना राष्ट्रीय स्तराशी जोडण्याचा हा प्रयत्न ठरला आहे.
**‘चंद्रपूर फिल्म फेस्टिव्हल – ऑल इंडिया २०२७’**च्या माध्यमातून चंद्रपूरला चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी शुभांगी बुरडकर, किरण खोब्रागडे, विकास गोटे, शफी, सुमित वैरागडे, नौशाद सिद्दक्की, अफरोज पठाण, आंबीद शेख यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




