Home जिल्हा आसाळा जि.प. शाळेचा क्रांतिकारी निर्णय: तिसरीतील लाडक्या लेकीच्या हस्ते ध्वजारोहण; गावकऱ्यांनी अनुभवला...

आसाळा जि.प. शाळेचा क्रांतिकारी निर्णय: तिसरीतील लाडक्या लेकीच्या हस्ते ध्वजारोहण; गावकऱ्यांनी अनुभवला आगळावेगळा स्वातंत्र्यदिन!

आसाळा :-देशाचा स्वातंत्र्यदिन हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा उत्सव नसून तो प्रत्येक नागरिकाच्या समानतेचा आणि अस्मितेचा सोहळा असतो. याच विचाराला प्रत्यक्षात आणत आसाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यंदाचा स्वातंत्र्यदिन अत्यंत अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. नेहमीच्या प्रथेला फाटा देत, शाळेत शिक्षण घेत असलेल्या तिसऱ्या वर्गातील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी श्रावणी श्रीकृष्ण जांभुळे हिच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. एका सर्वसामान्य चिमुरडीच्या हस्ते तिरंगा फडकवून गावकऱ्यांनी एकोपा व सामाजिक समतेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे.



💥 सकल संकल्पनेतून प्रेरणादायी उपक्रम 💥
समाजमनात सकारात्मक बदल घडवणारे, शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ डुकरे यांच्या सकल संकल्पनेतून आणि शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावचे पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची ही आगळीवेगळी परंपरा गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.



🙏 मान्यवरांची प्रमुख उपस्थिती 🙏
या ऐतिहासिक आणि दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊराव जांभुळे सर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून
💥  आसाळाचे पोलीस पाटील  श्री. राकेश ढोक
💥  माजी पोलीस पाटील  श्री. वासुदेव मळावी
💥  शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर भाऊ डुकरे उपस्थित होते.💥 आशा गाडवे 💥 अरचना गायकवाड 💥 दशरथ मगरे याशिवाय, स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या सोहळ्यासाठी आसाळा गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुरडीचा व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.



🙏सुसंस्कृत आयोजन आणि संचालन 🙏
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली, जी जिल्हा परिषद शाळेचे  मुख्याध्यापक श्री. आशिष ढोडरे सर यांनी केली. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल मांडत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या आत्मविश्वासात भर पडत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अत्यंत भारदस्त व ओघवत्या भाषेत संचालन सहायक शिक्षक श्री. उपासे सर यांनी केले.
आसाळा जि.प. शाळेने राबवलेला हा अभिनव उपक्रम संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला असून, समाजाला एक नवी दिशा देणारा हा स्वातंत्र्यदिन स्मरणात राहणारा ठरला आहे.