वरोरा (दिनांक ०७ ऑगस्ट २०२६) :- मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देणाऱ्या पालकांना वरोरा पोलिसांनी कठोर संदेश दिला आहे. पोलीस स्टेशन वरोरा अंतर्गत आज दिनांक ०७/०८/२०२६ रोजी २० अल्पवयीन दुचाकी चालकांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून विशेष समुपदेशन व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये वाहतूक नियमांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
💥 मार्गदर्शनातील मुख्य मुद्दे 💥
पालकांची जबाबदारी :- पालकांनी आपल्या अल्पवयीन मुले-मुलींना कोणतीही दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवण्यास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
⭕ कायदेशीर तरतुदींची माहिती :-अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास पालक आणि वाहनधारक या दोघांवरही लागू होणाऱ्या कठोर कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
⭕ सुरक्षिततेचे धडे :– दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच लहानपणापासूनच मुलांमध्ये वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सवय रुजवण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले.
🙏 प्रशासन आणि पोलिसांचा कडक इशारा 🙏
सहमती दर्शवूनही यापुढे जर अल्पवयीन मुले सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवताना आढळली, तर संबंधित वाहनधारक आणि त्यांच्या पालकांविरुद्ध प्रचलित मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act) गुन्हे दाखल केले जातील , असा सज्जड दम वरोरा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.




