भद्रावती :- गौतम नगर परिसरातील विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या कामाची नगरसेवक महेश मारोतराव जीवतोडे यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष न करता, विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी त्यांनी कडक निर्देश दिले आहेत. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रफुल भाऊ सारवान प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या निवारणासाठी प्राधान्य
गौतम नगरमधील साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी हे नाली बांधकाम अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी हे काम युद्धपातळीवर आणि उच्च दर्जाचे असावे, असा आग्रह महेश जीवतोडे यांनी धरला आहे.
विकासाचा वेग आणि गुणवत्तेशी तडजोड नाही.
नगराध्यक्ष मा. प्रफुलभाऊ चटकी यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रत्येक भागात विकासाची गंगा पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. ठेकेदारांनी कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नये आणि विहित मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सक्त सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
“गौतम नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या कामाची गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता आहे. जनतेच्या समस्या सोडवणे हीच आमची खरी जबाबदारी आहे.”
👉 महेश मारोतराव जीवतोडे, नगरसेवक, नगरपरिषद भद्रावती.
या पाहणी दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधींच्या या सक्रियतेमुळे शहरातील विकासकामांना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.




