वरोरा :- २२ जून रोज सोमवारला झालेल्या वादळी पावसामुळे वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड परिसरात मोठी दुर्घटना टळली. कल्यानेश्वर हनुमान मंदिरामागील सुमारे अनेक वर्षे जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून पडून दशरथ किटे यांच्या घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. याशिवाय शेजारील मंदा नैताम आणि गोविंदा बावणे यांच्या घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे झाड कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. झाडाचा मोठा भाग दशरथ किटे यांच्या घरावर पडल्याने घराच्या संरचनेचे मोठे नुकसान झाले, तर त्याचा फटका शेजारील दोन घरांनाही बसला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाचे कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच रस्त्यावर आणि घरांवर पडलेले झाड हटविण्याचे कामही तत्काळ हाती घेण्यात आले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संजय दानव यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाने पंचनामे त्वरित पूर्ण करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, तीन कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.




