Home Breaking News गोंडपिपरीतील १२ गावांच्या जमीन अधिग्रहणाविरुद्ध शेतकरी आक्रमक; लोकप्रतिनिधींना ‘गावबंदी’चा इशारा

गोंडपिपरीतील १२ गावांच्या जमीन अधिग्रहणाविरुद्ध शेतकरी आक्रमक; लोकप्रतिनिधींना ‘गावबंदी’चा इशारा

चंद्रपूर :- आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात  विकासाच्या नावाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध आता जनक्षोभ उसळला आहे. या अन्यायी जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आयोजित भव्य शेतकरी परिषदेला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा यावेळी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
जमीन ही आमची आई, सौदा होऊ देणार नाही!
परिषदेत बोलताना शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, जमीन ही शेतकऱ्यांची जीवनदायिनी आहे आणि तिचा कोणताही सौदा आम्ही सहन करणार नाही. विकासाच्या नावाखाली बळीराजाला त्याच्याच हक्काच्या जमिनीवरून बेघर करण्याचा डाव सरकार आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, परिषदेत उपस्थित एका वयोवृद्ध माऊलीच्या डोळ्यांतील अश्रू आणि तिचा संताप पाहून उपस्थितांचे हृदय हेलावले. “जर अशा परिस्थितीतही सरकारचे डोळे उघडत नसतील, तर ही सत्ता संवेदनहीन आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली.
आमदारांना थेट ‘गावबंदी’
संकटकाळात जनतेकडे पाठ फिरवणाऱ्या आणि निष्क्रिय राहिलेल्या लोकप्रतिनिधींविरुद्ध शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत, संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांविरुद्ध थेट ‘गावबंदी’ करण्याचा ऐतिहासिक ठराव या परिषदेत पारित केला. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर जनतेने दिलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा मानला जात आहे.
धडक मोर्चा; आंदोलनाचा वणवा पेटणार ?
परिषदेनंतर हजारो शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. हे आंदोलन म्हणजे केवळ सुरुवात असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे. जर सरकारने तातडीने हे जमीन अधिग्रहण रद्द केले नाही, तर हा वणवा संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा आंदोलकांनी दिला.
ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार सत्ता उपभोगत आहे, त्याच बळीराजाच्या संयमाचा अंत झाला आहे. आता रस्त्यावर उतरलेला हा शेतकरी वर्ग सत्ताधीशांची सिंहासने डळमळीत करण्यास सज्ज झाला आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.