वरोरा :-तालुक्यातील केळी येथील वना नदी घाटावर अवैध वाळू तस्करीमुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कडाडून टीका केली आहे. हा मृत्यू नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेली हत्या असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे नेमकी घटना ?
मिळालेल्या माहितीनुसार, केळी घाटावर अधिक मासानिमित्त स्नानासाठी १२ वर्षीय भावेश डोमकावळे हा मुलगा आला होता. यावेळी तो नदीपात्रातील खोल खड्ड्यात बुडू लागला. हे पाहून राहुल कोळसे (वय ३५, रा. शेकापूर) या धाडसी युवकाने त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. राहुलने भाच्याचा जीव तर वाचवला, परंतु वाळू तस्करीमुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यात स्वतः अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: राजू तिमांडे
या घटनेनंतर माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, “वना नदी पात्रात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर राहुल कोळसे यांचा जीव वाचला असता. त्यामुळे ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झालेली घटना आहे.”
तिमांडे यांनी दोषी वाळू तस्करांसह याकडे डोळेझाक करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट मागण्या :-
1)शेकापूर (बाई )(ता. हिंगणघाट, जि. वर्धा) व केळी (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथील नदी घाटात ४० फूट खोल खड्ड्यात मृत पावलेल्या राहुल कोळसे यांच्या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
2) शेकापूर व केळी नदी घाट परिसरात ३ ते ४ किलोमीटरपर्यंत करण्यात आलेल्या अवैध खनिज उत्खननाचे मोजमाप करून शासनाचा महसूल वसूल करण्यात यावा.3)अस्तित्वात असलेले चोरीचे रेती साठे तात्काळ जप्त करण्यात यावेत.
4)रेती घाटांवर अवैधरित्या वापरण्यात आलेली सर्व यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी.
5) शेकापूर (बाई) तसेच अन्य नदीकाठांवर साठवण्यात आलेली चोरीची रेती तात्काळ जप्त करण्यात यावी.
6) शेकापूर (बाई), शेकापूर (येळी), कोल्ही, खेकडी, बामर्दा, दारोडा, घाट सावली तसेच अन्य अवैध रेती घाट तात्काळ सील करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत.




