वणी :- झरी तालुक्यातील मुकुटबन येथील ‘आरसीसीपीएल’ (RCCPL) सिमेंट कंपनीच्या पॅकिंग प्लांटमध्ये कामगारांचे अतोनात हाल होत असल्याचे उघडकीस आले आहे. विदर्भात सध्या ४६ अंश सेल्सिअस एवढा भयानक उन्हाळा तापत असताना, या भट्टीत स्थानिक कामगारांना सिमेंटच्या बॅगा भराव्या लागत आहेत. या अमानुष छळ आणि व्यवस्थापनाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली काल (दि. २२ मे २०२६) कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवरून कंपनी प्रशासनाला थेट धारेवर धरण्यात आले. सध्या जीवाची लाहीलाही करणारे तापमान असताना, कंपनीच्या आधीच अति उष्ण ‘पॅकिंग प्लांट’मध्ये कामगारांना सिमेंटच्या गोण्या भरण्याचे अत्यंत धोक्याचे काम करावे लागते. बाहेरचे ४६ डिग्री तापमान आणि प्लांटमधील उष्णता, सिमेंटची धूळ व प्रचंड बाहेरची उष्णता यामुळे कामगारांचा श्वास कोंडत आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, एवढ्या कडक उन्हात आणि उष्ण तापमानात कामगारांसाठी साध्या पंख्याची किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय कंपनीने केलेली नाही. यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असून त्यांच्या आरोग्याचा आणि जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीच्या आवारात कामगारांसाठी कोणतीही रेस्ट रूम (विश्रांती गृह) नाही, इतकेच नव्हे तर हक्काचे जेवण करण्यासाठी कॅन्टीनची व्यवस्था नसल्याने, भर उन्हात या घामाघूम कामगारांना चक्क रस्त्यावर बसून जेवावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. या आंदोलनातील आणखी एक अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे स्थानिकांवरील अन्याय. बाहेरच्या राज्यातील कामगारांना आणून वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील भूमिपुत्र आणि स्थानिक मराठी कामगारांना जाणीवपूर्वक कामावरून काढून टाकले जात आहे. या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त करताना मनसे नेते राजू उंबरकर यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. “महाराष्ट्राच्या मातीत उद्योग करायचा, येथील संसाधने वापरायची आणि इथल्याच मराठी माणसाला रस्त्यावर आणायचे, ही हुकूमशाही मनसे कधीही खपवून घेणार नाही. आधी स्थानिक मराठी कामगारांना न्याय द्या आणि त्यांच्यासाठी पॅकिंग प्लांटमध्ये म्हणजेच धोक्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा कुलर व इतर योग्य सुविधा निर्माण करा, अन्यथा मनसे स्टाईलने कंपनीचे चक्के जाम करू,” असा थेट इशारा त्यांनी दिला. मनसेच्या या दणक्यामुळे RCCPL कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले. आणि प्रशासनाने त्वरित कुलर आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अजून ही कामगारांना त्यांचे हक्क आणि योग्य त्या सुविधा मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार यावेळी मनसे कडून व्यक्त करण्यात आला. काल झालेल्या या आंदोलना दरम्यान आणि व्यवस्थापनासोबतच्या चर्चेवेळी मनसे कामगार सेना व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ 🙏




