चंद्रपूर :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला समूळ नष्ट करण्यासाठी चंद्रपूर पोलीस दल कमालीचे आक्रमक झाले आहे. आज चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील तब्बल २७० सराईत गुन्हेगारांना पाचारण करून त्यांची कडक शब्दांत ‘परेड’ घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गेल्या पाच वर्षांत ‘खून’ (मर्डर) आणि ‘खुनाचा प्रयत्न’ (हाफ मर्डर) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा समावेश होता. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्वतः या गुन्हेगारांना समोर उभे करून सज्जड दम भरला.
👉 पुन्हा गुन्हा केल्यास थेट ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी गुन्हेगारांना कडक शब्दात ताकीद दिली आहे. बीएनएसएस (BNSS) कलम १२९ अन्वये या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून, त्यांच्याकडून ‘पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाही’ असे लेखी बंदपत्र (बॉण्ड) लिहून घेतले जात आहे. जर यापुढे कोणत्याही गुन्हेगाराचा गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळला, तर त्यांच्यावर थेट ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची किंवा तडीपारीची अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
🙏गुन्हेगारी वर्तुळात पसरली धास्ती🙏
चंद्रपूर पोलिसांच्या या अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिकेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
🙏पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण🙏
“गेल्या ५ वर्षांत मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डरच्या रेकॉर्डवरील सुमारे २७० आरोपींना आज आम्ही येथे बोलावले होते. त्यांची परेड घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. हे गुन्हेगार आता बंदपत्र लिहून देत आहेत. यापुढे कोणताही गुन्हा घडल्यास त्यांच्यावर थेट एमपीडीए आणि तडीपारीसारखे कडक कायदे लावले जातील. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, वेगवेगळ्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर आम्ही कठोर कारवाई करत राहू.”
👉 आयुष नोपानी ( जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर )
🙏 जय विदर्भ 🙏




