वरोरा:- चिकणी येथील एका शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे शेतमाल विक्री करताना मोठा धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. वजनात तब्बल ४८ किलोची तफावत आढळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर आंदोलन छेडले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आला होता. मात्र, त्या वेळी अधिकृत काट्यावर बाजार समितीचे कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकानेच वजन करून दिले.
या वजनामध्ये शेतमालाचे वजन १ क्विंटल ९० किलो (१९० किलो) इतके दाखविण्यात आले. मात्र, शेतकऱ्याला संशय आल्याने त्याने जवळच्याच एका व्यापाऱ्याच्या काट्यावर पुन्हा वजन केले असता ते २ क्विंटल ३८ किलो (२३८ किलो) इतके निघाले.
दोन्ही वजनांमध्ये तब्बल ४८ किलोची तफावत आढळून आल्याने शेतकरी संतप्त झाला. यानंतर इतर शेतकऱ्यांनीही या प्रकाराचा निषेध करत बाजार समितीच्या मुख्य गेटवर आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, अधिकृत काट्यावरच वजन करण्याची सक्ती आणि कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.
या घटनेमुळे बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




