वरोरा :- एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना, दुसरीकडे वरोरा तालुक्यातील मौजा नागरी येथील ‘पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-२)’ मागील सप्टेंबर महिन्यापासून (सुमारे चार महिन्यांपासून) बंद अवस्थेत आहे. दवाखान्याला कुलूप लटकलेले असल्याने आणि रिक्त पदे भरली न गेल्याने परिसरातील दुधाळ जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून, पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
प्रशासनाची टोलवाटोलवी आणि शेतकऱ्यांची परवड
नागरी परिसरात दोन दूध संकलन केंद्रे असून, या भागात संकरित (HF) दुधाळ गाईंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गावातील शेतकरी दररोज आपल्या आजारी जनावरांवर उपचारासाठी दवाखान्यात येतात, मात्र दवाखाना बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यासंदर्भात वरोरा येथील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला असता, ‘नागरी दवाखान्याचा अतिरिक्त प्रभार (चार्ज) दिला आहे,’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले जाते. तसेच, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी (चंद्रपूर) यांना पशुपालकांनी विचारणा केली असता, ‘माहिती घेऊन सांगतो’ असे आश्वासन देण्यात आले; परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
या पशुपालक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
दवाखाना बंद असल्याने व वेळेत उपचार मिळत नसल्याने स्थानिक पशुपालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यामध्ये शुभम नरड, मनोज नरड, विनोद सातपुते, विक्की महाकाळकर, राजेंद्र राडे, महादेव महाकाळकर, नामदेव पिसे, सोमेश्वर देवतकर, शंकर सातपुते, आकाश गाऊत्रे, प्रकाश चौधरी आणि सुरज घुबडे या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या समस्या मांडल्या आहेत.तात्काळ डॉक्टर नेमण्याची मागणी
दवाखान्याबाहेरील फलकावर ‘आकस्मिक प्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे’ असा उल्लेख असताना प्रत्यक्षात दवाखाना महिनोनमहिने बंद असणे हा पशुपालकांवर अन्याय आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी चंद्रपूर येथील जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि नागरी येथील दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित प्रभाकरराव कुडे यांनी केली आहे.





